मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 01:17 PM2024-06-30T13:17:26+5:302024-06-30T13:17:59+5:30

पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे.

Big news A case has been registered against sharad Pawars NCP leader Baban Gitte in connection with the murder of the sarpanch | मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

Parli Firing Update ( Marathi News ) : परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर  शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला असून यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)चे उपाध्यक्ष  शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे.

गोळीबाराच्या या घटनेत ग्यानबा ऊर्फ गोट्या मारोती गित्ते ( वय ३६ वर्ष,  रा. नंदागौळ ) हा जखमी झाला आहे . जखमीवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या जखमीचा पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, याप्रकरणी ग्यानबा गित्ते यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटलं आहे की,पाच जणांनी संगनमत करून  शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे व  ग्यानबा गित्ते या दोघांना बोलावून घेतले. यावेळी  बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का, असे बबन गित्ते म्हणाले. तेव्हा पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली आणि यावेळी बापू आंधळे यांच्यावर  बबन गित्ते याने कमरेचा पिस्तूल काढून डोक्यात गोळी मारली व दुसऱ्या एकाने कोयत्याने मारून बापू आंधळे यांना जिवंत ठार मारले. तसेच ग्यानबा  गित्ते यास तिसऱ्याने छातीत गोळी मारून जखमी केले.

ही घटना शनिवारी रात्री ८.३० सुमारास घडली. या घटनेने शनिवारी रात्री शहर हादरले होते. या प्रकरणी ग्यानबा गित्ते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी शशिकांत उर्फ बबन गित्ते (रा. बँक कॉलनी) ,  मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, वाघबेट, महादेव उद्धव  गित्ते, बँक कॉलनी,  राजाभाऊ नेहरकर, पांगरी, राजेश वाघमोडे, पिंपळगाव गाढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक चेतना तिडके , अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, स पो नी राजकुमार ससाने, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, डीबी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, दत्ता गित्ते, पांचाळ, गोविंद येलमटे व विष्णू फड  इतर पोलीस अधिकाऱ्यांनी  घटनास्थळी रात्री भेट दिली आहे .

जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे रात्रीपासून परळीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहे. सरपंच बापू आंधळे हे बबन गित्ते यांचे जुने सहकारी होते. जनक्रांती संघटनेचे संस्थापक बबन गित्ते यांच्या  पॅनलमधून मरळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लढवून सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तर बबन गित्ते यांनी  १७ ऑगस्ट २०२३ रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत ७०० गाड्यांचा ताफा नेत बीड मध्ये प्रवेश केला व त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


 

Web Title: Big news A case has been registered against sharad Pawars NCP leader Baban Gitte in connection with the murder of the sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.