मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:04 IST2025-03-20T13:03:48+5:302025-03-20T13:04:32+5:30
सीआयडीने विनंती केल्याने घेण्यात आला निर्णय

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण केज येथील न्यायालयात चालविले जात होते. परंतु, आरोपींना ने-आण करण्याच्या मुद्द्यावरून हे प्रकरण बीड जिल्हा न्यायालयात चालवावे, अशी मागणी सीआयडीने जिल्हा न्यायालयाकडे केली होती. या अर्जावर सुनावणी झाली असून, देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्हा न्यायालयात चालविले जाणार आहे. त्याची पुढील सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.
राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी दोषारोपपत्र बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल झाले होते. याची पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली. त्यानंतर ‘सर्व आरोपींना बीडवरून केज येथील न्यायालयात न्यावे लागत आहे. सुनावणीसाठी बीडहून आरोपींची केजला ने-आण करणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात व्हावी,’ असा अर्ज सीआयडीच्या वतीने बीड जिल्हा न्यायालयात देण्यात आला होता. त्यावर बुधवारी निर्णय झाला असून, संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्हा न्यायालयात चालविले जाणार आहे. विशेष सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी यास दुजोरा दिला.