उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 06:14 PM2024-01-08T18:14:35+5:302024-01-08T18:14:43+5:30

'आमच्या दोन पिढ्यांनी शिवसेनेचे निष्ठेने काम केले, परंतु पदरात हकालपट्टीचा निर्णय पडला.'

Big shock to Uddhav Thackeray; Hundreds of party workers of Beed district will join eknath Shinde group | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात

परळी- शिवसेना(उबाठा)गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना बीड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांची पक्षाने रविवारी हकालपट्टी केल्यानंतर, सोमवारी व्यंकटेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच, जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी व्यंकटेश शिंदे यांच्यासह परळी, अंबाजोगाई, वडवणी, तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे परळी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जिल्हाप्रमुखाच्या नियुक्तीवरुन मागील महिन्यात व्यंकटेश शिंदेसह अनेकांनी शिवसेना पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर एक महिना पक्ष आदेशानुसार शांत बसण्याचा निर्णय घेतला. परंतु एक महिन्यानंतर व्यंकटेश शिंदेसह इतर राजीनामा दिलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टीचा निर्णय पक्षाने जाहीर केला आहे.

शिवसेना(उबाठा) पक्षाच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करीत व्यंकटेश शिंदे यांनी आपण 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेना पक्ष प्रवेश करणार असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत घोषित केले. यावेळी शिंदे म्हणाले की, माझे वडील तालुकाप्रमुख स्व. बाबुराव शिंदे यांनी शिवसेनेसाठी आयुष्य खर्च केले. त्यानंतर आपणही शिवसेनेसाठी कष्ट घेतले. आमच्या दोन पिढ्यांनी शिवसेनेचे निष्ठेने काम केले. परंतु पदरात हकालपट्टीचा निर्णय पडला आहे. सुषमा अंधारे यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेचा बाजार मांडला आहे, असा आरोपही शिंदे यांनी याप्रसंगी केला.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी उपनगराध्यक्ष राजा पांडे, गजानन मुडेगावकर, शिंदे गटाचे शहर प्रमुख वैजनाथ माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परळी तालुक्यातील शिवसेनेचे 48 शाखेचे पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Web Title: Big shock to Uddhav Thackeray; Hundreds of party workers of Beed district will join eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.