एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 08:19 PM2021-02-12T20:19:29+5:302021-02-12T20:20:07+5:30
राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बीड : एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे खात्यातील पैसे काढणारी परराज्यांतील टोळी बीड सायबर विभागाने ९ फेब्रुवारीला ताब्यात घेतली. त्यांना ११ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता, आरोपींना १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच तपासामध्ये राज्यातील इतर गुन्हेदेखील उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
बिरू राजेंद्र पांडे (रा. मायापूर, जि. गया), सतीशकुमार नंदलाल प्रसाद (रा. बडकी, जि. गया), मोहम्मद असद नसीम खान (रा. मंजोलीगाव, जि. गया, ह. मु नालासोपारा मुंबई), मोहम्मद जावेद जब्बार खान (रा. मंजोलीगाव, जि. गया) अशी आरोपींची नावे आहेत. एटीएम कार्डमधून पैसे काढून घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास बीड सायबर विभाग करत होता. त्यांनी तांत्रिक पुराव्यावरून आरोपी निष्पन्न केले होते. मात्र, बिहारमध्ये जाऊन आरोपींना अटक करणे कोरोनामुळे शक्य नव्हते. मात्र, आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते.
यादरम्यान आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे एटीएम क्लोनिंग करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले, तसेच त्यांनी गुन्हादेखील कबूल केला. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सायबर विभागाचे प्रमुख पो.नि. रवींद्र गायकवाड हे करत आहेत.
बीडमधील सर्व लॉजची केली होती तपासणी
मागील वर्षी डिसेंबर २०२०मध्ये हे आरोपी बीडमध्ये आले होते. त्यांनी शहरातील व इतर ठिकाणच्या काही भागांत एटीएम मशीनला क्लोनिंग करणारे यंत्र बसवून एटीएमची माहिती मिळवली होती, तसेच ज्या एटीएम मशीनला क्लोनिंग यंत्र बसविले आहे. त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मागे उभा राहून त्याचा पिननंबर पाहिला जात होता. त्यानंतर बनावट एटीम कार्ड तयार करून खात्यातील रक्कम लंपास केली जात होती, अशी माहिती सायबर विभागाने दिली.
राज्यातील इतर गुन्हे होतील उघड
राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इतर कोणत्या शहरात असा गैरप्रकार करून पैसे लांबविले आहेत, याचा तपास बीड पोलीस करत आहेत.