चौकात दुचाकीस्वाराला धक्का; बस चालक-वाहकाला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न
By सोमनाथ खताळ | Published: March 26, 2024 06:40 PM2024-03-26T18:40:40+5:302024-03-26T18:41:44+5:30
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील घटना, मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
बीड : कल्याण (जि. ठाणे) आगाराची बस बीड स्थानकातून परळीकडे जात असताना बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एका दुचाकीस्वाराला धक्का लागला. त्यानंतर त्यांनी मित्रांना बोलावून घेत चालक, वाहकाला मारहाण केली. तसेच, खिशातील मोबाईल व पैसे काढून घेण्याचाही प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णा अशोक भागवत (वय२०, रा. पेठबीड), अविनाश मारोती काकडे (वय २९, रा. बलभीमनगर, बीड), सतपालसिं अभमन्यूसिंग बुंदेले (वय ४५, रा. बुंदेलपुरा, नवी भाजीमंडई, बीड) व मनोज जनार्धन काकडे अशी आरोपींची नावे आहेत. कल्याण आगाराचे महेश तांदळे हे कल्याण-परळी (बस क्र. एमएच २० बीएल १८८८) या बसची बीड बसस्थानकात नोंद करून परळीकडे जात होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच एक रिक्षा मध्ये आला. त्यामुळे तांदळे यांनी गाडीला ब्रेक लावला. पुढे जात असताना डाव्या बाजूने दुचाकी (एमएच २३ एएल ११६१) येऊन धडकली.
यात दुचाकीवरील एक जखमी झाला. त्याला उचलत असतानाच आणखी दोघे तेथे आले. त्यांनी चालकासह वाहकांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील मोबाईल व पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. येथे गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.