दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:04+5:302021-03-01T04:39:04+5:30
बीद : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे सहा गुन्हे घडले असून, याप्रकरणी ...
बीद : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे सहा गुन्हे घडले असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहरातील नवीन नरवडे कॉम्प्लेक्स समोर घडली. २६ फेब्रुवारी रोजी बाबूराव नारायण रणशिंगे (रा. फुले, पिंपळगाव) यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एम.एच.२३ एएल.२१७८) ही चोरी झाली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना २५ फेब्रुवारी रोजी गेवराईत घडली. दत्तात्रय नारायण जाधव हे चालक म्हणून काम करतात. सध्या ते गेवराई येथील गणेशनगर येथे राहतात. २५ ते २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांची २० हजारांची दुचाकी (एम.एच.२३ आर.७८४८) ही शहरातील मंगल कार्यालयानजीकच्या बांधकामाच्या पत्र्याच्या शेडमधून लंपास केली, तर काझी मझहर कमोद्दीन (रा. आयशा कॉलनी) यांची २० हजारांची दुचाकी (एम.एच.२३ पी.५८८७) घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाईतील क्रांतीनगर येथून १७ जानेवारीला अमर अर्जुन वाघमारे या विद्यार्थ्याची ३० हजारांची दुचाकी (एम.एच.४४ व्ही.०२४०) चोरट्यांनी लंपास केली. तसेच २६ फेब्रुवारी रोजी तेलगाव येथील भारत पेट्रोलपंपासमोरून माजलगाव ग्रामीण ठाण्यातील पोलीस कर्मचारी म्हेत्रे यांची १५ हजारांची दुचाकी (एम.एच.२३ एएल.५२०१) चोरी झाली. या प्रकरणी दिंद्रुड ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी जनावरांचा आठवडी बाजार नेकनूर येथे भरतो. त्या ठिकाणी आलेले सखाराम कुंडलिक जोगदंड (रा. गोगलवाडी, ता. बीड) या शेतकऱ्याची दुचाकी (एम. एच. २३ आर. ४९१५) चोरट्यांनी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाजारातून चोरून नेली. शोध घेतला परंतु मिळून न आल्यामुळे जोगदंड यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना आव्हान
जिल्ह्यातील विविध भागांत दररोज दुचाकी चोरी होत असल्याचे उघड झालेल्या गुन्ह्यांवरून उघड होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आव्हान देत चोरटे दुचाकी व इतर वाहने चोरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून दुचाकी चोरी करणाऱ्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी नगारिकांमधून केली जात आहे.