दुचाकी चोर सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:04 AM2021-02-21T05:04:32+5:302021-02-21T05:04:32+5:30
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल ...
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे.
तूर बहरल्याने समाधान
अंबाजोगाई : काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. दरम्यान, खरिपातील तूर बहरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात यावर्षी तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे तुरीचे पीक जोमात आले. सध्या तुरीचे पीक फुलोरा व कळ्यांच्या अवस्थेत आहे. यंदा दमदार पाऊस झाल्याने तुरीला मोठा फायदा झाला.
टपऱ्यांमध्ये पेट्रोल
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकानांमध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. तालुक्याच्या ठिकाणांहून अथवा जवळ असलेल्या पेट्रोलपंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणले जाते व या पेट्रोलमध्ये भेसळ करून ते चढ्या भावाने विकले जाते.
रस्त्याची दुरवस्था
केज : तालुक्यातील शिरूरघाट ते केज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रस्ता दुरूस्तीसंदर्भात मागणी करूनही दुर्लक्ष आहे.
ग्रामीण ग्राहक वैतागले
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागात काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करूनही संबंधितांनी दखल घेतलेली नाही. बीएसएनएलची लाईन बिघडल्याने इतर कंपन्यांच्या टॉवरची रेंज मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महत्त्वपूर्ण कामे खोळंबत असल्याने ग्राहक वैतागलेले दिसून येत आहेत.
अवैध धंदे वाढले
बर्दापूर : गावापासून जवळच असलेल्या बर्दापूर फाट्यावर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरित्या दारूची विक्री होते. पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्याची मागणी आहे.
वाहतुकीला अडथळा
पाटोदा : शहरातील विविध बँकांसह सार्वजनिक ठिकाणी दुचाकींची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाहनकोंडी होत आहे. काहीवेळा वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे कारवाया करण्याची मागणी होत आहे.