मुलास जाळून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप; माजलगाव न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:19 AM2018-11-29T00:19:56+5:302018-11-29T00:20:36+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिले. तिने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. ए.एस.वाघमारे यांनी बुधवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिले. तिने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. ए.एस.वाघमारे यांनी बुधवारी दिला.
सुरेश जयद्रथ मस्के (सोनवळा ता. अंबाजोगाई) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. सुरेश हा त्याची पत्नी विद्या हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने २६ मे २०१६ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरेशच्या तावडीतून सुटका करीत विद्या घराबाहेर धावली. त्यानंतर सुरेशने आपला पोटचा सात वर्षाचा मुलगा यश यालाही पेटविले. यामध्ये तो ८५ टक्के भाजला होता. दुसºया दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर विद्या यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३०२, ४९८ अ, १२० ब सह कलम ३४ भादंवि प्रमाणे सुरेशविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एम. तडसे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
त्यानंतर अॅड. अजय तांदळे यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी असणारी आई विद्या व वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. जी.पवार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तसेच यशचा मृत्यूपूर्व जबाबही शिक्षा लागण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. याच पुराव्यावरून अप्पर न्या. ए.एस.वाघमारे यांनी सुरेश मस्के याला दोषी ठरवित यशला जाळून मारल्याप्रकरणी कलम ३०२ नुसार जन्मठेप व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली. पत्नी विद्या हिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ नुसार दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद तसेच जाच, जुलूम केल्याप्रकरणी कलम ४९८ अ प्रमाणे दोषी ठरवून दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे वरिष्ठ सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना सहा. सरकारी वकील आर. ए. वाघमारे व अॅड. प्रमोद भोले यांनी सहकार्य केले.
यशचा मृत्यूपूर्व जबाब महत्वपूर्ण
जन्मादात्यानेच पेटवून दिल्याने यश हा सात वर्षीय मुलगा रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. याचवेळी पोलिसांनी त्याचा जबाब घेतला. जबाबात यशने स्वत: स्वाक्षरीही केली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याने जगाचा निरोप घेतला होता.