भाजपचं धक्कातंत्र: बीडमधून प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, पंकजा मुंडे लढणार लोकसभा निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:01 PM2024-03-13T20:01:50+5:302024-03-13T20:03:08+5:30
प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांच्याच भगिणी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
BJP Maharashtra Candidates ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी काही क्षणांपूर्वी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मागील दोन टर्मपासून खासदार असेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून प्रीतम यांच्या जागी त्यांच्याच भगिणी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याबाबतची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या अनेक निवडणुकांवेळी पंकजा मुंडे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. मात्र पंकजा यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले गेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता थेट पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभेची उमेदवारी स्वीकारण्यास सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी नकार दिला होता. याबाबत जाहीरपणे भाष्य करत मी माझ्या बहिणीच्या जागी उभी राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता भाजप नेतृत्वाकडून आदेश आल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास तयारी दर्शवल्याचं दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी दिले होते संकेत
शिरूरकासार येथील धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर महाशिवरात्र सोहळ्याचा समारोप शनिवारी झाला. महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन सुरू असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भेट देऊन पुढे गेले. नंतर आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, डॉ. ज्योती मेटे पाठोपाठ माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. लोकसभेसाठी माझी काळजी तुम्ही घ्या, नंतर तुमची काळजी मी घेते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.