'माझ्या नादी लागू नका'; गेवराईत पेट्रोल पंपावर भाजपा शहराध्यक्षाची दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:05 PM2020-04-11T19:05:26+5:302020-04-11T19:05:59+5:30
पास नसताना पेट्रोल देण्याची केली मागणी
गेवराई :- येथील एका पेट्रोल पंपावर पास नसताना दमदाटी करून पेट्रोलची मागणी केल्याचा प्रकार शहरातील भाजपा नगरसेविका पती तथा भाजपा शहराध्यक्ष यहियाखाॅ पठाण यांनी केल्याचे उघडकीस आले. त्यांच्यावर पेट्रोल पंपावरील कर्मचारी व मॅनेजरला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोना सारख्या रोगाने सा-या देशाला हैराण केले असुन त्यामुळे सर्वत्र लाॅकडावुन करण्यात आले आहे. या लाॅकडावुनच्या काळात शहरातील भाजपा नगरसेविका पती व भाजपा शहराध्यक्ष यहियाखाॅ पठाण हे शुक्रवार रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहरा जवळील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल टाकण्याबाबत त्यांनी श्रीकीसन जोंधळे या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यास सांगितले.असता त्याने रितसर परवानगी पास असल्याबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. माझ्या नादी लागु नको असे सांगून समज देण्यास आलेल्या व्यवस्थापक संभाजी मोटे यास देखील जीवे मारण्याची धमकी दिली. या कारणाने गेवराई पोलिस ठाण्यात श्रीकीसन जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यहियाखाॅ पठाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करीत आहेत.