“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 05:28 PM2023-12-05T17:28:11+5:302023-12-05T17:30:35+5:30
BJP DCM Devendra Fadnavis Beed: पुढच्या वेळेस अजित पवारांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
BJP DCM Devendra Fadnavis Beed: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. तर काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थान येथील सत्ता गमवावी लागली. काँग्रेसचे बीआरएसचे संस्थान खालसा करत तेलंगणमध्ये बाजी मारली. मात्र, महाराष्ट्रातील नेते, मंत्री दुसऱ्या राज्यात प्रचाराला जात असल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रम परळी येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पंकजा मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होते. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या योजनांची माहिती देतानाच विरोधकांवर खोचक शब्दांत हल्लाबोल केला.
कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही
येथे आल्यावर वैद्यनाथ आणि गोपीनाथ मुंडे अशा दोन नाथांचे दर्शन घेतले. गोपानाथ मुंडे यांच्या उर्जेमुळे आम्ही राजकारणात आहोत. बीडमधील १८ लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे. यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते
आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाला लागला. आम्ही जेथे गेलो तेथे चांगला निकाल लागला. आम्ही बाहेर गेल्यामुळे आमच्यावर टीका करतात. दुसऱ्या राज्यात कशाला प्रचाराला गेला म्हणतात. तुम्हाला कोणी शेजारच्या घरी बोलावते नाही, आम्ही इतर राज्यात जातोय तर तुमच्या पोटात का दुखते, असा खोचक सवाल करत, पुढच्या वेळेस अजित पवार यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरत केंद्र सरकारसोबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हाला दुष्काळमुक्त करायचे आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घर दिले जात आहे. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकास कामासाठी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करुन आणणार आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.