बीडमध्ये पाच पैक्की तीन नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व; राष्ट्रवादीला केवळ एका ठिकाणी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 06:08 PM2022-02-14T18:08:45+5:302022-02-14T18:09:19+5:30
शिरूर, आष्टी, पाटोद्यात भाजप, वडवणीत राष्ट्रवादी, केजमध्ये जनविकास आघाडी
- अनिल लगड
बीड : आष्टी, पाटोदा, शिरूर कासारमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत नगरपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. तर वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेस-आघाडी, केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडी-काँग्रेसने युती करुन सत्ता मिळविली आहे.
सोमवारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. आष्टी, पाटोदा, केजमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने येथे नगराध्यक्ष निवड बिनविरोध होणार हे नक्की होते. आष्टी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या पल्लवी स्वप्नील धोंडे तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुध्दे यांची बिनविरोध निवड झाली.
पाटोदा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सय्यद खातीजाबी सय्यद अमर तर उपनगराध्यक्षपदी शरद बामदळे यांची बिनविरोध निवड झाली.
शिरूर कासार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा रोहिदास गाडेकर तर उपनगराध्यक्षपदी श्वेता प्रकाश देसरडा यांची निवड झाली. आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे.
वडवणी नगरपंचायतीत सुरूवातीपासून चुरशीची निवडणूक झाली. नगरध्यक्षपदासाठी चुरस होईल, अशी शक्यता होती. परंतु निवडीच्या वेळी भाजपचे आठ सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-आघाडीच्या वंदना शेषराव जगताप यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदी बन्शीधर मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. येथे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार केशवराव आंधळे गटाने सत्ता मिळविली आहे.
केजच्या नगराध्यक्षपदी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सीताबाई बनसोड व शीतल पशुपतीनाथ दांगट यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. केजमध्ये काँग्रेसने जनविकास परिवर्तन आघाडीशी युती करून सत्ता हस्तगत केली आहे.
पक्षीय संख्याबळ : (नगरपंचायती एकूण-५)
भाजप-३-
राष्ट्रवादी काँग्रेस-आघाडी -१
जनविकास-काँग्रेस-१