भाजपने केले ‘महिला सक्षमीकरण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:25 AM2019-10-15T00:25:18+5:302019-10-15T00:26:05+5:30
भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.
माजलगाव : नारी शक्तीचा आणि महिलेचा खरा सन्मान हा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात झाला आहे. महिला सक्षमीकरण करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना या सरकारने सुरु केल्या. त्याचेच यश म्हणून एकट्या बीड जिल्ह्यात सुमारे तीस हजार बचत गटांची स्थापना झाली. ते उत्तम प्रकारे सुरु असून, यातून महिलांचा विकास साधण्याचे काम झाले आहे. त्यामुळे भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.
महिला बचत गटातून महिला या स्वावलंबी बनून आपल्या पायावर उभा राहिल्या आहेत हेच खरे यश आहे. तसेच अंगणवाडी ताई महिलांना योग्य सन्मान देण्याचा निर्णय घेऊन मानधनात वाढ केली. माता भगिनींना चुलीच्या त्रासापासून मुक्ती देत पंतप्रधान उज्वला गॅस योजना दारोदारी देऊन महिलांनाच सन्मान केला. गरजवतांना आपल्या हक्काचे घर घरकुलाच्या माध्यमातून देत हक्काचे ठिकाण दिले. गरजू रुग्णांना जीवनदायी योजनेतून न परवडणारा उपचार देण्याच्या कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याचे काम भाजप सरकारने केले.
याभागात देखील चांगल्या पद्धतीने या योजना सर्वसामान्य महिलांना लाभ मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाने लोकापर्यंत खरे काम पोहचविण्याचे काम केल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी उपनगराध्यक्षा सुमन मुंडे, गौरी देशमुख, रुपाली कचरे, संजीवनी राऊत, प्रतीक्षा मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यापुढेही याच पद्धतीने योजनेचा लाभ मिळण्यासाठी भाजपचे उमेदवार रमेश आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले.