Pankaja Munde: '...तर तो माझा अखेरचा क्षण असेल'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:24 PM2022-03-22T17:24:05+5:302022-03-22T17:24:54+5:30
Pankaja Munde:'मी बीडसाठी खूप काही केले, पण बीडच्या बदनामीचे खापर माझ्यावर फोडले.'
बीड: राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आणि भाऊ-बहिण असलेले पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळते. नुकतंच धनंजय मुंडेंनी पंकजांवर बीड जिल्ह्याची बदनामी केल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी पलटवार केला आहे.
'तो माझा अखेरचा क्षण असेल'
बीड येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या, ''माझ्या काळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. माझे ऑपरेशन झाले, बोलायला घसा दुखतोय, तरीदेखील मी बोलतेय. चांगली कामे केली पाहिजे, करुन घेतली पाहिजे. मी बीडसाठी खूप काही केले, पण बीडच्या बदनामीचे खापर माझ्यावर फोडले. बीडच्या बदनामीचे काम मी कधीच केले नाही, तसे काम केले तर तो माझा शेवटचा क्षण असेल'', असा पलटवार पंकजा मुंडेंनी केला.
किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदाम इमारतीचे उदघाटन आज माझ्या हस्ते संपन्न झाले. यानिमित्ताने विकास कामांचे उदघाटन, विविध परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. #धारूरpic.twitter.com/9gzGyoqKRT
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 22, 2022
'तोपर्यंत फेटा घालणार नाही...'
यावळी पंकजांनी राज्यातील ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. ''जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. विरोधक माझ्यावर खोटे आरोप करतात, पण माझ्याकडे कोणतेही फार्म हाऊस नाही, मोठे ऑफिसही नाही. राजकारणात ज्यांचा अहंकार जास्त असतो, त्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. सरकारमधील लोकांनी अतिशय वाईट कामे केली आहेत, त्यांचा पराभव झाल्याशिवार राहणार नाही'', अशी टीकाही यावेळी केली.