लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:59+5:302021-03-20T04:32:59+5:30
बीड : एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळमात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे. बीड ...
बीड : एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळमात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे. बीड जिल्हा बँकेची निवडणूक लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला, असाही सूर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून उमटत आहे. महाविकास आघाडी संपूर्ण ताकतीने निवडणूक लढणार, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. १९ पैकी ८ जागांवर निवडणूक होत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली असल्याची चर्चा असली तरी महाविकास आघाडी ही निवडणूक अत्यंत ताकतीने लढणार आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थ संजीवनी ठरणे आवश्यक आहे. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल हे जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवत आहेत. या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जात असून, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे. जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कारभाराला पाहता एकूण मतदानाच्या ९० टक्के मतदान आघाडीच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वास आघाडीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चात्ताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला १०० टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर २० मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असून, प्रत्येक केंद्रावर मतदान शांततेत, नियमाप्रमाणे पार पाडावे, असे आवाहन शेतकरी विकास पॅनलचे आ. प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, केशवराव आंधळे, बजरंग सोनवणे, बन्सी सिरसाट, विजयसिंह पंडित, रामकृष्ण बांगर, प्रा. सुशीला मोराळे, सचिन मुळूक, दत्ता पाटील, दादासाहेब मुंडे यांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केले आहे.
===Photopath===
190321\192_bed_18_19032021_14.jpeg
===Caption===
धनंजय मुंडे : पूर्ण क्षमतेने निवडणुकीला सामोरे जाणार