"तो काय उद्योग करतो मला थोडी माहिती"; समर्थकाने केलेल्या मारहाणीवर सुरेश धसांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:44 IST2025-03-06T13:28:05+5:302025-03-06T13:44:18+5:30
बीडमधल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"तो काय उद्योग करतो मला थोडी माहिती"; समर्थकाने केलेल्या मारहाणीवर सुरेश धसांचे स्पष्टीकरण
Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून बीड जिल्हा चर्चेत आहे. अशातच आता बीडच्या शिरूर तालुक्यात एका तरुणाला बॅटने मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणारी व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असून भाजप आमदार सुरेश यांचा समर्थक असल्याचे समोर आलं. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या सुरेश धस यांच्यावरच टीका केली जात आहे. यावर बोलताना जर मारहाण झालेल्या व्यक्तीने तक्रार दिली तर कारवाई करावी असं सुरेश धस यांनी म्हटलं.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात सतिश भोसले नावाच्या व्यक्तीने एका तरुणाला बॅटने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतीश भोसले भाजपा भटक्या विमुक्तचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. व्हिडीओमध्ये सतिश भोसले तरुणाला बॅटने अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतिश भोसले हा सुरेश धस यांचा समर्थक असल्याचे समोर आलं. सतिश भोसलेले सुरेश धस यांच्यासोबत असलेले फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. या प्रकरणावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना तो ओळखीचा असल्याचे सुरेश धस यांनी मान्य केलं.
"समोरच्या व्यक्तीन फिर्याद द्यावी. या घटनेचे मी समर्थन केलेले नाही. तो जर असं काही म्हटला असेल तर त्याची मी भेट घेईल. सतिश भोसलेला मी ओळखतो. तो कधीतरी माझ्याकडे येतो. पाठीमागे तो काय उद्योग करतो हे मला थोडी माहिती आहे. शंभर टक्के सतिश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे. पीडित समोर आले तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मी पहिल्यापासून म्हणत आहे," असे सुरेश धस यांनी म्हटलं.
"कोण कुणाला बॉस म्हणतो याची माहिती आपण ठेवू शकत नाही. तो मला बॉस म्हणत असेल तर मीच म्हणतोय की त्याच्यावर योग्य कारवाई व्हायला हवी. ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे हे मला माहिती आहे. हे प्रकरण बीडमधील नाही. खोटं सोनं दिल्याच्या कारणावरुन हा प्रकार घडला असल्याची माझी माहिती आहे," असंही सुरेश धस म्हणाले.