भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
By सोमनाथ खताळ | Published: March 7, 2024 05:55 PM2024-03-07T17:55:30+5:302024-03-07T18:21:56+5:30
बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या.
- संतोष स्वामी
दिंद्रूड (बीड) : माजलगाव तालुक्यातील संगम येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यासाठी भाजप खा.डॉ.प्रीतम गोपिनाथ मुंडे या आल्या होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना स्टेजवरच अचानक भोवळ आली. यामुळे पाठिमागे असलेल्या खूर्चीवर त्या तात्काळ बसल्या. हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. हा प्रकार मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला.
बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. तेथील चार खासगी कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर संगम येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यासाठी त्या गेल्या होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच त्या अचानक स्टेजवर कोसळल्या. जवळपास पाच मिनिट त्या बेशुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यानंतर महिला आघाडीच्या नेत्या संजीवनी राऊत यांनी खासदार मुंडे यांना आधार देत गाडीपर्यंत नेले. तेथून त्यांना तातडीने परळी येथील निवासस्थानी हलविण्यात आले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून प्रकृती चांगली असून घाबरण्याचे काहीच कारण नाही, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. ऊन, जेवण नसणे आणि धावपळ यामुळे ही भोवळ आल्याचे सांगितले जात आहे.