‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 06:41 IST2025-04-16T06:40:21+5:302025-04-16T06:41:21+5:30
Beed Crime news: बाबासाहेब प्रभाकर आगे (३४) असे मयताचे नाव आहे, तर नारायण शंकर फपाळ (३८) असे आरोपीचे नाव आहे.

‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
माजलगाव (जि. बीड) : शहरातील भाजप कार्यालयातून बाहेर निघालेल्या तालुका सरचिटणीसवर वार करत असताना ते तेथून पळाले. वाचवा म्हणत ओट्यावर बसलेल्या लोकांकडे पळाले असता त्यांच्यावर पाठीमागून आलेल्या आरोपीने कोयत्याने शरीराच्या एका बाजूस वार केला. ‘बलात्कार करतो का’ असे म्हणत त्याच्या शरीरावर सपासप वार केले. यात पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. हत्येनंतर आरोपी पोलिसांना शरण आला.
बाबासाहेब प्रभाकर आगे (३४) असे मयताचे नाव आहे, तर नारायण शंकर फपाळ (३८) असे आरोपीचे नाव आहे. माजलगाव बसस्थानकापासून जवळच असलेल्या भाजप कार्यालयात भाजपचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे आपल्या साथीदारांसह बसले होते.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडत असताना हातात कोयता घेऊन आलेल्या नारायण फपाळ याने अचानक येऊन बाबासाहेब आगेंवर वार करण्याचा प्रयत्न केला.
सकाळपासूनच करत होता पाठलाग
सकाळपासून नारायण हा बाबासाहेब आगे यांचा पाठलाग करत होता. तो भाजप कार्यालयात बसलेला असताना नारायण हा बाजूलाच असलेल्या एका दुकानासमोर दबा धरून बसला होता. जसा तो बाहेर आला, तसा याने वार केला; परंतु तो चुकवला आणि पुढे जाऊन पुन्हा पकडून वार केले.
हत्या केल्यानंतर आरोपी नारायण हा स्वत:हून माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गेला. तेथे हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याने आपण खून केल्याची कबुली दिली.