Video - "मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली"; मुंडे बहीण-भावात रंगलं शाब्दिक युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 11:32 AM2022-03-20T11:32:55+5:302022-03-20T11:35:00+5:30
BJP Pankaja Munde And Dhananjay Munde Over Beed : पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
बीडमधील मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्र्वर याठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे (BJP Pankaja Munde) यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याच निमित्ताने या बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगले. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो प्रत्येक कोनशिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचे आज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू, मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"बीड जिल्ह्याची बदनामी कोणी केली हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. मी बीड जिल्ह्याची काळजी केली आहे. मी विरोधी पक्षात आहे. ते विरोधी पक्षात असताना ते किती त्रास द्यायचे, वैयक्तीक आरोप करायचे, किती चौकशा लावायचे, किती लोकांना वेठीला धरायचे? हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये मीडियाला देखील त्यांनी सोडलेलं नाही. मीडियाने देखील काही बातमी लावली तर त्यांच्यावर हक्कभंग आणायचे. मी तर अशा कोणत्याच गोष्टींचा कधीच वापर केलेला नाही" असं म्हणत पंकजा मुंडे यांनी हल्लाबोल केला आहे.
बीड: मुंडे बहीण भावात रंगले शाब्दिक युद्ध; विविध विकासकामांच्या लोकार्पण, भूमिपूजनवेळी आरोप-प्रत्यारोप, नेमके काय म्हणाल्या पंकजा मुंडे, पाहा, व्हिडिओ...#beed#dhananjaymunde#pankajamundepic.twitter.com/FkqrFeFYX5
— Lokmat (@lokmat) March 20, 2022
"एकही पंचायत समिती नव्हती बीड जिल्ह्यात, एकही जिल्हा परिषदेची इमारत नव्हती. एकही नॅशनल हायवे नव्हता, रेल्वे नव्हती... त्यांनी कधी कौतुक केलं?... त्यामुळे त्यांनी जे केलं नाही त्याची दुसऱ्याकडून अपेक्षा करायची ही त्यांची चुकीची सवय आहे. मी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर राजकारण नाही. खूप खाली पाहावं लागतं मला. राजकारण बाजुला ठेवून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, चांगल्या निर्णयासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो. बीड जिल्ह्याचा विकास केला हे सत्य जगासमोर आहे. तुम्ही एखादं आर्ग्युमेंट जिंकू शकत नसाल तर ते बदला अशी आताच्या पालकमंत्र्यांची स्टॅटर्जी आहे" असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.