परळीसह जिल्हाभरात भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:40 AM2019-05-24T01:40:42+5:302019-05-24T01:41:56+5:30
गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच निकालाचा ट्रेंड पाहता खा. डॉ. प्रीतम यांच्या मताधिक्यात प्रत्येक फेरी अखेर सुरुवातीला ५ ते ९ हजारांची व १३ व्या फेरीनंतर १२ ते १६ हजारांची आघाडी मिळत गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी/बीड : गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच निकालाचा ट्रेंड पाहता खा. डॉ. प्रीतम यांच्या मताधिक्यात प्रत्येक फेरी अखेर सुरुवातीला ५ ते ९ हजारांची व १३ व्या फेरीनंतर १२ ते १६ हजारांची आघाडी मिळत गेली. विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू असल्याने कार्यकर्त्यांचा परळीतील यशश्री निवासस्थानी प्रचंड जल्लोष सुरु झाला. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी देखील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. बीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या कार्यालयासमोर, तसेच भगीरथ बियाणी यांच्या संपर्क कार्यालयासमोर गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फेरीनंतर मताधिक्यांचे आकडे स्पष्ट होताच ढोलीबाजाच्या तालावर कार्यकर्ते नाचत होते.
बीडची निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. १६ व्या फेरीपर्यंतच खा. प्रीतम मुंडे विजयाच्या समीप पोहोचल्या होत्या. सकाळपासून निकालाकडे लक्ष लावून बसलेल्या कार्यकर्त्यांनी खा. मुंडे यांच्या विजयाच्या शक्यतेचा अंदाज यशश्री निवासस्थानाकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे वाजत गाजत आणि फटक्यांची आतिषबाजी करत यशश्री निवासस्थानाकडे येत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून मुंडे भगिनींनी त्यांची भेट घेऊन आनंद द्विगुणित केला.
दरम्यान, खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना आघाडी मिळताच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी पंकजा व प्रीतम यांना पेढा भरविला. यावेळी मुंडे साहेबांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.
आज विजयाच्या वाटेवर असताना पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. सकाळी त्यांनी स्वत:चा व प्रितमताई यांचा बालपणीचा मुंडे साहेबांना फोनवर बोलतानाचा फोटो ट्विट केला होता. माझे बाबा तथा माझे नेते मुंडे साहेब यांची याप्रसंगी खूप आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे यश त्यांचेशी शेअर करता येत नाही; पण आज त्यांना आमचे नक्कीच कौतुक वाटले असते आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता, अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.