विधान परिषद मिळावी म्हणून क्षीरसागर पराभवाचे खापर भाजपवर फोडत आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:59 PM2019-12-09T12:59:40+5:302019-12-09T13:52:21+5:30
भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचा आरोप
बीड : विधानसभेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर विजयी व्हावेत यासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मला वा भाजपच्या एकही जबाबदार पदाधिकाऱ्यांना फोन केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर निवडून यावेत, असे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना वाटत होते का, अशी शंका आहे, तसेच पराभवाचे खापर भाजपवर फोडून विधान परिषद मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पत्रपरिषदेत केला.
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांमुळेच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप नेते राजेंद्र मस्के, जि. प. सदस्य अशोक लोढा, स्वप्नील गलधर, चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगाजे आदींची उपस्थिती होती. चिंतन बैठकीमध्ये भाजपमुळेच पराभव झाल्याचे खोडसाळ मत व्यक्त केले गेले. क्षीरसागरांच्या घरातच समन्वयाचा अभाव होता. त्यांचे काम करा, असा एकही संदेश किंवा फोन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपच्या एकाही जबाबदार पदाधिकाऱ्यांला केला नाही, त्यामुळे नेमका पराभव का झाला याचे उत्तर क्षीरसागर यांनी शोधावे. खापर भाजपवर फोडू नये. पंकजा मुंडे यांच्या आदेशाने आम्ही जीव तोडून प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
पराभवासाठी शहरातील खड्डे ठरले कारणीभूत
शहरभर सर्वत्र खड्डे पडलेले होते. यापूर्वीच्या निवडणुकांत रात्रीतून रस्ते केले जात, तशी तगडी यंत्रणा त्यांच्याकडे असूनही खड्डे का बुजवले नाहीत. क्षीरसागर यांच्या पराभवासाठी हे जाणीवपूर्वक केल्याचा गंभीर आरोप पोकळे यांनी केला. क्षीरसागर यांनीही भाषणात रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच मतदानात खड्डे पडल्याचा उल्लेख केला. परंतु, त्यांना बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्याविषयी थेट बोलता आले नाही. हा सर्व विधान परिषद मागण्यासाठी खटाटोप असल्याचेही पोकळे म्हणाले.