बीड जि.प.च्या CEOना शिवीगाळ करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला २२ मे पर्यंत तात्पुरता जामीन
By सोमनाथ खताळ | Published: May 13, 2023 07:23 PM2023-05-13T19:23:13+5:302023-05-13T19:23:45+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दालनात घुसून शिवीगाळ करण्यात आली होती.
सोमनाथ खताळ, बीड: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दालनात घुसून शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणात पालकमंत्री अतूल सावे यांचा पीए आहे, असे सांगणारे भाजप कार्यकर्ते धनराज राजाभाऊ मुंडे (रा.वडवणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात आता न्यायालयाने मुंडे यांना २२ मे पर्यंत तात्पूरता जामिन दिला आहे. तसेच सीईओंच्या पीएसह अंगरक्षक, शिपाई अशा पाच लोकांचे जबाब तपास अधिकाऱ्यांनी घेतले आहेत.
सीईओ पवार हे ११ मे रोजी दुपारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वॉर रूममधील शिक्षकासोबत बोलत होते. याचवेळी धनराज हे दालनात आले. मी पालकमंत्र्यांचा पीए आहे. 'तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजता, लावू का पालकमंत्र्यांना फोन, तुम्ही पालकमंत्र्यांना बोला' असे म्हणत गोंधळ घातला. त्यानंतर सीईओ पवार यांना शिवीगाळ केली. दालनातील हा आवाज ऐकून अंगरक्षक सचिन साळवे व स्वीय सहायक सचिन सानप हे दालनात आले. त्यांनी धनराज यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी हुज्जत घातली. या प्रकारानंतर स्वत: पवार यांनी बीड शहर पाेलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली होती. १२ मे रोजी या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात उमटले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मुंडे यांना अटक करण्यासह कठोर कारवाईची मागणी केली होती.
धनराज मुंडे यांना अटक करण्यासाठी आम्ही गेलो होतो. परंतू ते मिळून आले नाहीत. आता त्यांना न्यायालयाने २२ मे पर्यंत तात्पूरता जामिन दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणात सीईओंचे पीए, बॉडीगार्ड, शिपाई अशा पाच लोकांचे जबाब घेतले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत. -रमेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक, बीड शहर