"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", महाराष्ट्रातील भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:47 PM2023-06-01T12:47:28+5:302023-06-01T12:48:01+5:30
देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
बीड : देशभर गाजत असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी भूमिका भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे.
दरम्यान, अभियानाची माहिती देण्यासाठी बुधवारी संघर्षयोद्धा भाजप जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार मुंडे म्हणाल्या, केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणून मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. लोकशाहीत ही घटना स्वागतार्ह नसल्याचे त्या म्हणाल्या.
आखाड्याबाहेरील 'कुस्ती' अद्याप सुरूच
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैगिंक छळ केला असून त्यांना अटक व्हावी, या मागणीसाठी देशातील नामांकित पैलवान २३ एप्रिलपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला वेगळे वळण लागल्याचे दिसले. आंदोलक नवीन संसद भवनासमोर निर्दर्शनं करण्याच्या प्रयत्नात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांची धरपकड केली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं हरिद्वार येथील गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी तूर्तास हा निर्णय मागे घेतला आहे.