कॉँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:37 AM2018-04-13T00:37:16+5:302018-04-13T00:37:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : संसदेत लोकहिताचे निर्णय घेतले जात असताना कॉंग्रेस पक्ष नाहक गोंधळ आणि विरोध करून बाधा आणत आहे. काँग्रेसने संसदेत लोकशाहीची हत्या करण्याचे पाप केल्याचा आरोप करीत गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील भाजपचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात भाजपाची सत्ता आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व सामान्य जनतेच्या हिताचे आणि देशासाठी कल्याणकारी निर्णय घेत आहेत. मात्र नीतीभ्रष्ट काँग्रेसला हे बघवत नसल्याने संसदेत लोकहिताच्या निर्णयाला खोडा घालण्यासाठी विरोधाला विरोध करत असल्याची टीका या वेळी विविध पदाधिकाऱ्यांनी केली.
या उपोषणात आ. संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, जि. प. सभापती संतोष हंगे, सर्जेराव तांदळे, राणा डोईफोडे, मुन्ना हजारे, डॉ. लक्ष्मण जाधव, अॅड. संगीता धसे, चंद्रकांत फड, रामदास बडे, अजय सवाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.