काळ्या बाजारात जाणारे रॉकेल विशेष पथकाने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:54 AM2019-03-26T00:54:13+5:302019-03-26T00:54:37+5:30
काळ्या बाजारात रॉकेल घेऊन जाणारे पिकअप पोलिसांनी पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली.
बीड :काळ्या बाजारात रॉकेल घेऊन जाणारे पिकअप पोलिसांनी पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. विशेष म्हणजे वाहन पकडल्यानंतर दोन दिवसानंतर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्यापही हे रॉकेल कोणाचे, याचा तपास लागलेला नाही.
शहरातील बार्शी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मालवाहू जीपमधून स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी आलेले रॉकेल काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी २२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिराजवळ सापळा लावला. संशयास्पद मालवाहू जीपची (क्र.एमएच २० सीटी-३५१७) झडती घेतली तेव्हा त्यात रॉकेलच्या १० टाक्या आढळल्या. कागदपत्रांची मागणी केल्यावर चालक गोंधळून गेला. त्यानंतर ६० हजार किंमतीच्या रॉकेलसह तीन लाखांची जीप असा तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेत शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केला. शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. अखेर रविवारी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉकेलची तपासणी केली तेव्हा ते सार्वजनिक वितरण प्रणालीतीलच असल्याचे समोर आले. या प्रकरणी फौजदार बालाजी ढगारे यांच्या फिर्यादीवरुन सय्यद तालेब सय्यद खालेक (२१, रा. मोहंमदीया कॉलनी, बीड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तपास निरीक्षक शिवलाल पुर्भे करत आहेत.