बीड जिल्हा रूग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शन दिले एक अन् नोंद पाचची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 03:13 PM2021-08-13T15:13:28+5:302021-08-13T15:14:10+5:30
Black market of remedesivir injection : बीड तालुक्यातील आंबीलवडगाव येथील भिमराव खराडे हे २ ऑगस्ट रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले.
- सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रूग्णालयातील उपचाराबद्दल तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच एका वृद्धाला १२ दिवसांत केवळ एकवेळेस सलाईन लावली. तर एकदा रूग्णाच्या मुलाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन ( Remedesivir Injection ) दिल्याची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर ना सलाईन लावली ना सही घेतली. परंतू कागदोपत्री पाच इंजेक्शन दिल्याची नोंद आहे. यावरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे दिसत असून नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे.
बीड तालुक्यातील आंबीलवडगाव येथील भिमराव खराडे हे २ ऑगस्ट रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. कोरोना चाचणी ( Corona Test ) निगेटिव्ह असल्याने आणि धाप लागत असल्याने त्यांना संशयित वॉर्डात दाखल केले. तेव्हापासून आतापर्यंत खराडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. उपचारासाठी आतापर्यंत केवळ दोन वेळा सलाईन लावली. त्यातही एकवेळा आऊट गेली. तेव्हाही कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन देताना नातेवाईक अथवा रूग्णाची सही अथवा अंगठा घेणे बंधनकारक आहे. परंतू खराडे रूग्णाबाबत मुलगा भाऊसाहेब यांची केवळ एकचवेळेस सही घेतली. त्यानंतर सही घेतलीच नाही. तर दुसऱ्या बाजूला भिमराव खराडे यांना पाच इंजेक्शन दिल्याची नोंद आहे. यावरून पुन्हा एकदा जिल्हा रूग्णालयात इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे.
इंजेक्शन दिल्याची स्वाक्षरी एकदाच
रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक आहे. रूग्णाला इंजेक्शन दिल्याची स्वाक्षरी एकदाच घेतली जाते. मी माहिती घेतली असता पाचही इंजेक्शन दिलेले आहेत. तरीही मी थोडी खात्री करतो.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
चौकशी करावी
१२ दिवसांपासून माझे वडील उपचार घेत आहेत. आतापर्यंत दोनच वेळा सलाईन लावली. त्यातही एकवेळा आऊट गेली. तरीही लक्ष दिले नाही. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत केवळ एकदाच स्वाक्षरी घेतली. कागदावर मात्र, पाच इंजेक्शनची नोंद आहे. याची चौकशी करून उपचाराकडे लक्ष द्यावे.
- भाऊसाहेब खराडे, रूग्णाचा मुलगा