जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:01+5:302021-04-17T04:34:01+5:30
बीड : बीड जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक तीव्रतेने वाढला. आज शहरासह गाव खेड्यात कोरोनाने शिरकाव केला. जनतेमध्ये भीती आणि ...
बीड : बीड जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक तीव्रतेने वाढला. आज शहरासह गाव खेड्यात कोरोनाने शिरकाव केला. जनतेमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण असताना वैद्यकीय सुविधा तुटपुंज्या पडत आहेत. रेमडेसिविर या कोरोना महामारीतून जीव वाचवणाऱ्या अत्यावश्यक इंजेक्शनचा प्रशासनाच्या नाकाखाली काळाबाजार चालू आहे. पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष असून रुग्णांची लुबाडणूक होत आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला आहे.
पोलिसांत गुन्हा नोंद होऊनही औषध निरीक्षकावर अथवा विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात सत्ताधारी असमर्थ ठरले आहेत. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र देऊन रेमडेसिविर इंजेक्शन आणि लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देण्याचे सत्र सुरू केले आहे. कोविड रुग्ण, नातेवाईक यांच्या भेटी घेऊन त्यांना धीर देण्याचे काम करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा गलथान अनागोंदी कारभार चालू आहे. कोणतीही चाचणी न घेता कोविड वाॅर्डात कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या व्यक्तीला दोन दिवस ॲडमिट करण्यात आले. तक्रारीनंतर त्या रुग्णाची सुटका झाली. प्रचंड तापमानात कोरोना रुग्णांना वाॅर्डात साधी पंख्याची व्यवस्था करता आली नाही. अनेक वाॅर्डांतील वातानुकूलित यंत्र बंद पडले आहेत. रुग्णांचे गुरांसमान हाल होत आहेत. सुविधेवर मात्र लाखो रुपये खर्च करण्यात आले आणि आजही होत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयानेच उपलब्ध करून देणे शासनाने बंधनकारक केले असताना त्यांची अंमलबजावणी होत नाही. जिल्हा नियंत्रण कक्षाचा रेमडेसिविर काळ्याबाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही.