काळविटाचे शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; मांसाची वाटणी करताना चौघे रंगेहाथ जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:23 PM2024-08-26T18:23:05+5:302024-08-26T18:23:22+5:30
केज तालुक्यातील वरपगाव शिवारात पोलीसांचा छापा
- मधुकर सिरसट
केज : काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची वाटणी करताना चौघांना पोलिसांनी तालुक्यातील वरपगाव येथील शिवारातून शनिवारी रात्री ताब्यात घेतले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी ( दि. २४) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना पोलीस उपनिरिक्षक मूरकुटे यांनी कळवले की, तालुक्यातील वरपगाव शिवारात बन्सी पवार याच्या पत्र्याच्या शेडमध्ये काळविटाची शिकार करुन मांसाची वाटणी सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता वरपगाव येथील शिवारातील शेडवर छापा मारला. यावेळी बन्सी पवारच्या पत्र्याच्या शेडमध्ये भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक काळवीटाच्या मासांचे हत्याराने तुकडे करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून दोन काळविटांचे शिंगे आणि हत्यारे जप्त केली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर यांच्या तक्रारीवरून भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे सर्वजण रा वरपगाव यांचेसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरूद्ध केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना रविवारी केज न्यायालयासमोर हजर केले आसता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर विधीसंघर्षग्रस्त बालकास बीड येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
आठवड्यातील दुसरी घटना..
आठ दिवसापूर्वीच कळत अंबा शिवारात एका काळविटाची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करुन वन परिक्षेत्र कार्यालय धारुर येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी उत्तम चिवटे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी..
विभागाचे मुख्य वनसंरक्षक हनुमंत धुमाळ आणि विभागीय वनाधिकारी ए डी गरकल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त वनपाल नवनाथ पाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे आणि वनपाल मोरे यांच्या आदेशाने वनमजूर वचिष्ट भालेराव, संभाजी पारवे, नवनाथ जाधव, वाहन चालक शाम गायसमुद्रे सिद्धेश्वर चव्हाण ऑपरेटर मनोज डोरनाळे, जीवन गोके यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.