अत्याचार अन् फोटो व्हायरल; ब्लॅकमेलिंगला कंटाळून मजूर महिलेचा जीवन संपविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:38 IST2025-04-10T19:37:40+5:302025-04-10T19:38:06+5:30
आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत.

अत्याचार अन् फोटो व्हायरल; ब्लॅकमेलिंगला कंटाळून मजूर महिलेचा जीवन संपविण्याचा प्रयत्न
दिंद्रुड ( बीड) : शिल्लक मजुरी दे अन्यथा शारीरिक संबंध ठेव नाही तर तुझ्या पतीला मारून टाकेल अशी धमकी देत दोन ते तीन वर्षांपासून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील महिलेवर मुकादमाने अत्याचार केले. तसेच अश्लील फोटो व्हायरल केल्याने महिलेने मानसिक व शारीरिक जाचास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, महिलेचा तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात गुरुवारी अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील ऊसतोड मजूर जोडपं अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते, दरम्यान दोन लाख रुपयांची बाकी त्यांच्याकडे शिल्लक राहिल्याने तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने महिलेने अत्याचार केले. तसेच भेटायला ये अन्यथा फोटो व्हायरल करेल अशा धमक्या दिल्या.
दरम्यान, सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने अमोलने महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले. शिनगारे याच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात अत्याचारासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत.