खुनांमुळे रक्ताच्या नात्याला ‘डाग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:57 AM2018-12-25T00:57:47+5:302018-12-25T00:58:32+5:30
जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत. तर २० खून हे शेजारी, मित्र व इतर नात्यात झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल २० खून हे पती, पत्नीच्या लढ्यातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे रक्ताच्या नात्यालाच ‘डाग’ लागल्याचे दिसते.
मागील वर्षभरात जिल्ह्यात ४५ खूनाच्या घटना घडल्या आहेत. याची कारणे शोधली असता किरकोळ व क्षुल्लक कारणावरून वाद होणे आणि खुनासारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे समोर आले. पती, पत्नीमध्ये वाद होत असल्याने तब्बल २० खून झालेले आहेत. यावरून चार भिंतीच्या आत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. तसेच बहिण भाऊही खुनाच्या घटनांत मागे नाहीत. सख्या बहिण भावाच्या २ तर चुलत बहिण भावाच्या ३ घटना खुनाच्या घडल्या आहेत. रक्तातले नातेच एकमेकांच्या जीवावर उठत असल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारीही वाढत चालली आहे. त्यामुळे हे रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.