खून, दरोड्याचा तपास ढिम्म !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:20 AM2019-04-06T00:20:47+5:302019-04-06T00:21:41+5:30
गेवराई शहरातील खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्धेची हत्या करून दरोडेखोरांनी सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अद्यापही यामध्ये कसलाच ‘क्ल्यू’ मिळालेला नाही.
बीड : गेवराई शहरातील खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्धेची हत्या करून दरोडेखोरांनी सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अद्यापही यामध्ये कसलाच ‘क्ल्यू’ मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यातच गेवराई पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून गेवराई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. वारंवारचे घडणारे गंभीर गुन्हे आणि त्यातच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यातच सोमवारी पहाटेच्या सुमारास खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्ध महिलेचा खून करून दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेला पाच दिवस उलटूनही अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. या गंभीर प्रकरणाचा तपास अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
त्यातच गुरूवारी सायंकाळी नागझरीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. एकावर तलवारीने सपासप वार करून दिवसाढवळ्या हत्या केली. तर दुसरा गंभीर जखमी झाला. या दोन घटना अवघ्या आठवड्यात घडल्याने गेवराई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
चार आरोपी मोकाटच : पोलिसांची चार पथके आहेत कोठे ?
नागझरी खून प्रकरणात तीन आरोपीला अटक केली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येतील आणखी चार आरोपी मोकाटच आहेत. याचा तपास गेवराई पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
शर्मा खून आणि त्यांच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या तपासासाठी चार पथके नियूक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. पाच दिवस उलटूनही या पथकांना मुख्य आरोपींपर्यंत तर दुरच साधा ‘क्ल्यू’ सुद्धा काढता आलेला नाही. त्यामुळे हे चार पथके आहेत तरी कोठे आणि करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक आणि गेवराई पोलीस याचा तपास करीत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या हाती यश आलेले नाही.