मंदीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:03+5:302021-03-31T04:34:03+5:30
बीड : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले. ...
बीड : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले. यामुळे अनेक वाहने बंद राहिली. उद्योगधंदे बंद राहिल्यामुळेही वाहतूक व्यवस्था ठप्प राहिली. याचा मोठा फटका वाहन मालक व वाहन चालक यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे वाहतूक व्यवस्थापनाचे अर्थचक्र बिघडल्याने, वाहन चालकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
अंबेजोगाई : शहरातील योगेश्वरी नगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांना या रस्त्याने जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठमोठ्या खड्ड्यांत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडतात. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने घडत आहेत, अशी स्थिती असूनही शासनाच्या वतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याकडील झुडपांचा वाहनधारकांना त्रास
गेवराई : तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. या वर्षी मोठा पाऊस झाल्याने गवत व झुडपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने रस्त्यालगत वाढलेली ही झुडपे तोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
हातगाड्यांमुळे वाहतूककोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने, तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. लाॅकडाऊन असलेतरी शिथिल वेळ ६ तासांची असल्याने हातगाडे उभ केले जातात. या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. जुने ते नव्या बस स्थानकापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.
चोऱ्यांमध्ये होतेय वाढ; गस्त वाढवावी
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागते. दिंद्रुड, तेलगावसह परिसरातील गावात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
बोंडअळीबाबत मार्गदर्शनाची गरज
अंबेजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी कापसावर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
राखेच्या वाहनांनी दुचाकीस्वार त्रस्त
सिरसाळा : परळी ते सिरसाळा मार्गावर धावत असलेल्या राखेच्या वाहनांमुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. चष्मा लावूनही डोळ्यामध्ये राखेचे कण जात असल्याने, या रस्त्याने दुचाकी चालविणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यात सिरसाळ्यापासून टोकवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असल्याने वारा सुटला की, त्या भट्ट्यावरील राख हवेत मिसळून राखेचे प्रदूषण होत आहे.
रात्रीची गस्त सुरू करा
अंबाजोगाई : शहर व परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वसाहतींत असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.