सरपंच गटाला झटका, दिग्गजांच्या पदरी पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:21+5:302021-01-19T04:35:21+5:30
शिरूर कासार : तालुक्यात पंधरा जानेवारीला झालेल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानुसार कोळवाडी व कान्होबाची वाडी ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान ...
शिरूर कासार : तालुक्यात पंधरा जानेवारीला झालेल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानुसार कोळवाडी व कान्होबाची वाडी ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंच गटाला पराभव चाखावा लागला. तर रायमोहा या मोठ्या ग्रामपंचायतीमधे दिग्गजांच्या पदरी निराशा आली. रायमोहा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच मदन जाधव तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वसंत सानप यांना पराभव पत्कारावा लागला. तर पंचायत समिती सदस्य जालिंदर सानप यांनी चांगले यश मिळवले. सुभाष क्षीरसागर यांनी आपला प्रभाव कायम ठेवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत मतदारांनी काहींना पुन्हा स्वीकारले तर काहींना मात्र नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले. कोळवाडीत तिरंगी लढत झाली होती. यात नवख्या साईनाथ नेटके यांनी चार सदस्य आपल्या गटाचे निवडून आणून सरपंच पदावर अधिकार सिध्द केला. तर सरपंच म्हणून राहिलेल्या बाबासाहेब नेटके यांना आपल्या पॅनेलमधे फक्त दोनच सदस्य राखता आले. त्यांच्या चुलतीने निवडणुकीत बाजी मारली. तर कान्होबाची वाडी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच संतोष सव्वाशे व गोवर्धन जाधव यांनी पाच सदस्य निवडून आणत ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला. सरपंच असलेले बबन मोरे यांच्या पत्नी मंगल मोरे या विजयी झाल्याने त्यांनी आपले प्रतिनिधीत्व कायम ठेवले .