माजलगावातील दोघांचे मृतदेह अंबाजोगाईत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:59+5:302021-01-23T04:34:59+5:30
कोरड्या विहिरीत तर दुसऱ्याचा तळ्यात माजलगाव : तालुक्यातील दोघांचे मृतदेह अंबाजोगाई शहरात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई ...
कोरड्या विहिरीत तर दुसऱ्याचा तळ्यात
माजलगाव : तालुक्यातील दोघांचे मृतदेह अंबाजोगाई शहरात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तळ्यात पाण्यात बुडून ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला, तर महाराष्ट्र बँक जवळ असलेल्या एका कोरड्या विहिरीत मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो माजलगावचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अंबाजोगाईतील महाराष्ट्र बँकेजवळ एका विहिरीत बुधवारी मृतदेह आढळून आला? होता. त्याचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला? असावा, असा कयास काढून त्याची ओळख पटविण्यात येत होती. हा व्यक्ती माजलगाव शहरातील कठाळू जाफर शेख असल्याचे सांगण्यात येते. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याचा मृतदेह अंबाजोगाई येथील विहिरीत कसा आला, तो माजलगाव येथून अंबाजोगाईला का आला, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित असतानाच, गुरुवारी सकाळी माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील अंकुश चव्हाण नामक ३८ वर्षीय इसमाचा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पाठीमागे एका तळ्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत अंकुश चव्हाण याच्या नात्यातील व्यक्ती रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्यामुळे तो त्या ठिकाणी होता. सकाळी तो अंघोळीसाठी रुग्णालयाच्या पाठीमागे गेला. तळ्याची खोली माहीत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.