बीडमध्ये कचरा जाळताना बॉडी स्प्रेचा झाला स्फोट; दोन बालके जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:09 PM2018-06-12T16:09:39+5:302018-06-12T16:09:39+5:30
कचरा पेटविताना त्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन बालके किरकोळ जखमी झाली.
बीड : कचरा पेटविताना त्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन बालके किरकोळ जखमी झाली. ही घटना शहरातील हनुमान चौकात रविवारी सायं. ५.३० वाजता घडली. रविवारी ही माहिती दडून राहिली. सोमवारी ती समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस व बाँबशोधक व नाशक पथकाने भेट देत याची पाहणी केली.वैष्णवी सुधीर कारगुडे (६) आणि यश हरिश्चंद्र सांगळे (७) अशी जखमी बालकांची नावे आहेत. विमल हरिश्चंद्र सांगळे यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.
हनुमान चौकातील चिंचोलकर यांच्या मालकीच्या घरात शंकर बाबर व हरिश्चंद्र सांगळे हे किरायाने राहतात. सहा दिवसांपूर्वी शंकर बाबर याने खोली खाली केली आणि खोलीतील काही कचरा समोरच्या रिकाम्या जागेत टाकला. रविवारी सायंकाळी पाणी जाण्यास अडचण होत असल्याने विमल सांगळे यांनी समोर पडलेला कचरा पेटवून दिला. याचवेळी अचानक कचऱ्यातून मोठा स्फोट झाला. बाजूलाच खेळणारे वैष्णवी व यश यांना यामध्ये जखम झाली. यशच्या तोंडाला - हाताला, तर वैष्णवीच्या अंगाला - डोक्याला व अनेक ठिकाणी जखम झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
रविवारी हा प्रकार कोणीही पोलिसांना सांगितला नाही. सोमवारी याची वाच्यता होताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी बाँबशोधक व नाशक पथकासह भेट दिली. हा प्रकार किरकोळ असून, त्याची नोंद केल्याचे पुर्भे यांनी सांगितले.