मुकादमाच्या घरी आढळला ऊसतोड मजुराचा मृतदेह, दोन भावांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:19 AM2021-11-01T10:19:22+5:302021-11-01T10:23:11+5:30
जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत पतीचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मयताची पत्नी व नातेवाईकांनी घेतली होती.
केज : बीड तालुक्यातील ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके याचे केज येथील ऊसतोड मुकादम जिवराज हांगे व बाबुराव हांगे यांनी 29 ऑक्टोबर रोजी अपहरण करून केज येथील शिक्षक कॉलनीतील तिसऱ्या मजल्यावर त्यांना डांबून ठेवून खून केल्या पकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारी वरून दोघा विरूद्ध अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत पतीचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मयताची पत्नी व नातेवाईकांनी घेतली होती. अखेर या प्रकरणी दोघांवर अपहरण करून खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
बीड तालुक्यातील ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके याचे केज येथील ऊसतोड मुकादम जिवराज केशव हांगे व बाबुराव केशव हांगे या दोघा भावाने दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सफेपूर येथील राहत्या घरातून चार चाकी वाहनातून अपहरण करून त्यास केज येथील शिक्षक कॉलनीतील तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले होते दरम्यान ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके याचे अपहरण केल्यावर त्याच्या पत्नीस कारखान्यावर गेल्यावरच पतीस सोडण्याचे मुकादमाने सांगितल्याने ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके यांची पत्नी मिरा घोडके या त्यांचे ट्रॅक्टर व ऊसतोड कामगार यांना घेऊन साखर कारखान्यावर गेल्या होत्या कारखान्यावर जाताना त्यांनी पतीस मोबाईलवर फोन केला मात्र फोन दुसऱ्या व्यक्तीने घेत पतीही कारखान्यावर गेल्याचे त्यांना सांगितले. त्या कारखान्यावर गेल्यावर पती तिथे मिळून आला नाही.
दरम्यान, पतीचे केज येथे ऊसतोड मुकादम जीवनराज हांगे यांच्या घरी तिसऱ्या मजल्यावर संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाल्याने त्या परत साखर कारखान्यावरून केज येथे आल्या. पतीचा मृत्यू हा ऊसतोड मुकादम जीवराज हांगे व बाबुराव हांगे यांनी अपहरण करून त्यांचा खून केल्याचा आरोप मयताची पत्नी मिरा घाडगे यांनी केला तसेच जो पर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत नाही तो पर्यंत पतीचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याचं पवित्रा घेतला होता. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा मयताची पत्नी मिरा बाळासाहेब घोडके हिच्या फिर्यादी वरून ऊसतोड मुकादम जिवराज केशव हांगे व बाबुराव केशव हांगे या दोघा भावा विरूद्ध केज पोलिस ठाण्यात अपहरण करून खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे करत आहेत.
आरोपीच्या शोधात पोलिस पथक रवाना -
ऊसतोड मुकादम तथा मजूर बाळासाहेब घोडके याचे अपहरण करून खून करणाऱ्या जिवराज हांगे व बाबुराव हांगे यांच्या शोधात पोलिस पथक रवाना केल्याची माहिती प्र.पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली आहे