दफनविधीसाठी जागा नसल्याने महामार्गावर ठेवला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:15 PM2019-09-21T13:15:46+5:302019-09-21T13:18:12+5:30
वडार समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला
गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील नवीन नागझरी येथे वडार समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने एका तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा दफनविधी कुठे करायचा, असा प्रश्न करीत नातेवाईकांनी शुक्र वारी मृतदेह धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठेवून २० मिनिटे ठिय्या मांडला. त्यानंतर पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत समाजाला दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली.
येथील मनिषा अनिल शिंदे (२०) नामक तरूणीचा आजाराने गुरूवारी रात्री ९ वाजता मृत्यू झाला. गावात वडार समाजाच्या दफनविधीसाठी जागा नसल्याने शुक्रवारी सकाळी संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह आणून ठिय्या दिला. माहिती मिळताच पोउनि. विठ्ठल शिंदे व नायब तहसिलदार प्रल्हाद लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जागा मिळेपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. अखेर प्रशासनाने गायरान जमीन गट नंबर ३८ मधील एक एकर जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या परिसरात दुपारी दीड वाजता दफनविधी करण्यात आला.
नागझरी येथे ४० वर्षांपासून वास्तव्य
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे गेल्या ४० वर्षांपासून वडार समाजातील अनेक कुटुंबे वास्तव्य करून राहतात. यातील काही कुटुंबांकडे स्वत:ची शेती आहे. तर अनेकांकडे शेती नाही. रोजमजुरीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.ज्यांच्याकडे शेत आहे, ते लोक शेतात आतापर्यंत दफनविधी करीत आले आहेत. व ज्यांना पर्याय नाही अशी कुटुंबे रस्त्याच्या कडेला दफनविधी करतात. या समाजाला स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती.
शुक्रवारी तरुणीच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्र मक झाले होते. पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी समजूत घालत तात्काळ मार्ग काढल्याने हा प्रश्न सुटला व दफनविधी करण्यात आला.
-विठ्ठल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गेवराई
तालुक्यात विविध जाती, धर्म समुदायासाठी अंत्यविधी व दफनविधीच्या जागेचे १० ते १५ अर्ज आलेले असतील. त्यांना तात्काळ जागा देण्यात येईल. असे प्रसंग पुन्हा होणार नाहीत.
प्रल्हाद लोखंडे, नायब तहसीलदार