बोगस कोरोना योद्ध्याकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:54+5:302021-05-06T04:35:54+5:30
घाटनांदूर : डॉक्टरांचा ॲप्रन घालत व गळ्यात कोरोना योद्ध्याचे ओळखपत्र घालून कोविड लसीकरणावेळी तथाकथित कोरोना योद्ध्याकडून येथील प्राथमिक ...
घाटनांदूर : डॉक्टरांचा ॲप्रन घालत व गळ्यात कोरोना योद्ध्याचे ओळखपत्र घालून कोविड लसीकरणावेळी तथाकथित कोरोना योद्ध्याकडून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धुमाकूळ घातला जात असून, काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामात आडकाठी करीत नेत्यांच्या नावे दमदाटी करण्याचा प्रकार घडत असल्याने कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
कोरोनासारख्या गंभीर आजारात जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशा वेळी सर्वांनी त्यांच्या कामाची प्रशंसा करीत सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र, संकटातही संधी शोधणारे काही महाभाग मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मश्गुल असल्याचे दिसून येत आहे. येथील एक युवक डॉक्टरांचा ॲप्रन घालत व गळ्यात कोरोना योद्ध्याचे ओळखपत्र घालून कोविड लसीकरणाच्या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचे दिसून आले. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, दमदाटी करीत राज्यातील विविध नेत्यांची नावे घेऊन त्रास व धमक्या देत आहे. घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एम. पी. डब्ल्यू. सुरेश काकडे यांच्या बाबतीत हा गंभीर प्रकार घडला असून, त्यांनी याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्याकडे केली आहे. तथाकथित कोरोना योद्धा येथून बदली झालेल्या डॉक्टरांच्या सहीचे ओळखपत्र गळ्यात घालून दवाखान्यात फिरत आहे. लसीकरणावेळी पैशाची देवाण-घेवाण करून ऑनलाईन नोंदणी करण्याचा उपद्व्यापही हा कार्यकर्ता करीत असल्याचे सुपरवायझर एस. के. गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांना विचारले असता आमच्याकडे असला कोणीही कोरोना योद्धा नसल्याचे स्पष्ट करीत पुन्हा असा प्रकार घडला तर गय करणार नसून, सरळ पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.