बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कोरोना चाचणी न करताच उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:14+5:302021-04-24T04:34:14+5:30
अंबाजोगाई : वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता नसतानाही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट ...
अंबाजोगाई : वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता नसतानाही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट सुरू झाला आहे. कोरोनाची तपासणी न करताच हे डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. परिणामी अनेक रुग्णांची स्थिती गंभीर होत असल्याने पुन्हा त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. एप्रिलच्या २२ दिवसांत कोरोनाच्या रुग्णांनी तीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंबाजोगाईत कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळणेही अवघड झाले आहे. त्यातच औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन नाही, तर ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ मिळेल त्या ठिकाणी जाऊन उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात याचाच गैरफायदा बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अधिकृत पात्रता अथवा शासनाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण न केलेले अनेक जण स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा देत आहेत. असे डॉक्टर त्या रुग्णांची कोरोनाची तपासणी न करताच सलाईन लावणे, विविध प्रकारचे इंजेक्शन, औषधी देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मुख्य आजार काय? त्याची योग्य उपचार पद्धती या डॉक्टरांना माहीत नसल्याने त्या रुग्णांचा आजार वाढत जातो. नंतर त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची वेळ येते. गाव परिसरात शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र असतानाही रुग्ण या बोगस डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालतात. याबाबत आरोग्य यंत्रणा व स्थानिक ग्रामसमितीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, तरच अशा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कमी होऊ शकतो.
शोधमोहीम राबवा
अंबाजोगाई तालुक्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबविली होती. त्यावेळी अशा बोगस डॉक्टरांची संख्या कमी झाली होती. मात्र आता कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर आरोग्यसेवा तोकडी पडत असल्याचा गैरफायदा घेत बोगस डॉक्टर वाढले. शासनाने ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवल्यास अशा गैरप्रकारांना आळा बसेल, अशी मागणी देवळा श्रमकरी ग्रुपचे रवींद्र देवरवाडे यांनी केली आहे.
आरोग्य केंद्रातच उपचार घ्या
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवा सुरू आहे. कोरोना अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी गावात उपचार घेण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे उपचार घ्यावेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावेत. ज्या रुग्णांना जास्त त्रास होत आहे त्यांनी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी यावे. कोणताही आजार अंगावर काढू नका.
- डॉ. बालासाहेब लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी