उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज; मदतीच्या हातांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:45 PM2023-10-05T17:45:56+5:302023-10-05T17:51:09+5:30
हिटरमुळे ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर; मुलीचा मृत्यू, मायलेकाची मृत्यूशी झुंज
- नितीन कांबळे
कडा ( बीड): हिटर सुरू राहिल्याने पाण्याने भरलेले ड्रम वितळून उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्यासह आई गंभीर भाजल्याची घटना घडली होती. त्यात तीन दिवसापूर्वी मुलीचा मृत्यू झाला. तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मायलेकरांच्या उपचाराची परवड होत आहे. याबाबत माहिती मिळताच मदतीचे हात सरसावले. मात्र, अजूनही मोठ्या मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे.
आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील २६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान ड्रम वितळून उकळते पाणी जवळच झोपलेल्या सुनीता योगेश सावंत ( ३०), श्रेयश ( ८) , श्रेया ( ५) यांच्या अंगावर पडले. यात तिघेही गंभीर भाजले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रविवारी ( दि.१) सकाळी ५ वर्षीय श्रेयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च पेलवणे अवघड होत आहे. याची माहिती मिळताच काही त्यांना मदत केली. मात्र, आणखी मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे. योगेश सावंत, शहाजी सावंत यांच्या ८८०६२५६१०२ या मोबाईल नंबरवर युपीआय द्वारे मदत करण्याचे आवाहन सांगवी आष्टीचे सरपंच विनोद खेडकर यांनी केले आहे.