बीड अवैधगर्भपात प्रकरण: बोंबला, सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत;आता साखळी कशी शोधणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:16 PM2022-06-17T20:16:50+5:302022-06-17T20:17:16+5:30

पोलीस कोठडीतून हाती काहीच नाही : एजंट, शिकाऊ डॉक्टर, लॅबवाल्यासह नातेवाइकांना न्यायालयीन कोठडी

Bombala! All the accused are in judicial custody; Now how to find the chain? | बीड अवैधगर्भपात प्रकरण: बोंबला, सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत;आता साखळी कशी शोधणार?

बीड अवैधगर्भपात प्रकरण: बोंबला, सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत;आता साखळी कशी शोधणार?

Next

- सोमनाथ खताळ
बीड :
अवैध गर्भपात प्रकरणात पोलीस पूर्ण तपास करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपींना पोलीस कोठडी घेऊनही त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीन व्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही. त्यातच मुद्दे न मांडता सरसकट सर्वच आरोपींना पोलीस कोठडी मागितल्याने आणि आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केल्याने सर्वच आरोपींना न्यायालयीन काेठडी मिळाली आहे. तपास अधिकाऱ्यांचे अपयश यानिमित्ताने समोर आले आहे. आता सर्वच आरोपी जेलमध्ये गेल्याने साखळी कशी शोधणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जूनला मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेरचे उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे, रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा. अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यातील सीमा हिने आत्महत्या केली आहे, तर याच गुन्ह्यात सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, ता. जि. औरंगाबाद) या शिकाऊ डॉक्टरलाही अटक केली होती. या सर्वांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी सोनोग्राफी मशीन कोणाची आहे? कोठून आली? याचा शोध घेणे बाकी असून, यासाठी सर्वच आरोपींची तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती; परंतु न्यायालयाने कोणत्या आरोपीकडून काय माहिती काढायची आहे? याची व्यवस्थित मांडणी न केल्याने सर्वांनाच न्यायालयीन कोठडी दिली. तपास अधिकाऱ्यांच्या या अपयशामुळे गर्भपात प्रकरणाची साखळी शोधण्याची आशा संपुष्टात आल्याची चर्चा आहे.

म्हणे, आरोपी सहकार्य करत नाहीत
या प्रकरणात आरोपी सहकार्य करत नाहीत, त्यामुळे तपास आहे त्याच ठिकाणी असल्याची कबुली तपास अधिकारी बाळासाहेब आघाव यांनी न्यायालयातही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मग एवढ्या दिवस आरोपींना पोलीस कोठडीत काय पाहुणचार केला का? तपास अधिकाऱ्यांनी स्वत:चे काय स्कील वापरले? कोठडीत अट्टल गुन्हेगार पोपटासारखे बोलतात, मग हेच गप्प कसे राहिले? असा सवाल उपस्थित होत आहे.

आता या प्रश्नांची उत्तरे बाकी?
शिकाऊ डॉक्टरकडे सापडलेली सोनोग्राफी मशीन कोणाची? ती काेठून आली? आतापर्यंत किती महिलांचे गर्भलिंग निदान झाले? त्या कुठल्या होत्या? त्यातील मुली असलेल्या महिला किती? यात गर्भपात झालेल्या महिला किती? त्यांचा गर्भपात कोणी केला? कोठे केला? यात आणखी किती एजंट आहेत? तपासणी करणारे आणखी कोणी आहेत का? शिकाऊ डॉक्टरने जालन्याच्या डॉ. गवारे याचे नाव घेऊनही त्याला आरोपी का केले नाही? तो कधीपासून जिल्ह्यात येऊन तपासणी करतो? त्याने कोणत्या महिलांची तपासणी केली? जेथे शीतलची रक्त तपासणी झाली होती त्या रिपोर्टवर स्वाक्षरी कोणाची? त्याची खात्री केली का? शीतलकडे सापडलेली रक्कम कोणाची? तिच्याकडे एवढा पैसा आला कोठून? तिच्या घरात गर्भपाताची औषधी व साहित्य कोठून आले? आता यातील साखळी कशी शोधणार? अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.

महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; इतर गप्प का?
अवैध गर्भपात प्रकरणात सत्ताधारी, विरोधकांसह नेते, पुढारी गप्प होते. त्यावरही 'लोकमत'ने प्रकाश टाकला होता. अखेर केज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास विशेष पथकामार्फत करण्याची मागणी केली आहे. एका आमदाराने आवाज उठला असला तरी इतर अद्यापही गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या प्रकरणाचा तपास संथ झाल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे.

जेलमध्ये जाण्यापूर्वी बिर्याणीवर ताव
न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर सर्व आरोपींना कारागृहात जमा करण्यासाठी सायंकाळच्या सुमारास नेण्यात आले. यावेळी काही आरोपींनी बिर्याणीवर ताव मारला. पोलीस उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे म्हणाले, आम्ही पाच ते सहाजण बंदोबस्ताला होतो. जेवण केल्याशिवाय आरोपींना जेलमध्ये घेत नाहीत. नातेवाईकांना जेवण आणायला सांगितले होते. आमचा एक माणूसही सोबत होता. दाळ, भात, चपाती खाल्ली असावी, आपण एवढे लक्ष दिले नाही, असे उत्तर दिले. दरम्यान, जेवणातून काही गैरप्रकार घडला असता तर जबाबदार कोण? पोलीस एवढे गाफील कसे काय राहू शकतात? मुळात पोलिसांनी तपासणी न करताच जेवण दिलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Bombala! All the accused are in judicial custody; Now how to find the chain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.