मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा, संचालकाकडून तात्काळ मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 07:29 PM2022-12-21T19:29:46+5:302022-12-21T19:29:54+5:30
राजीनामा राजकीय दबावपोटी की अडीच वर्षाची मुदत संपल्याने? उलट सुलट चर्चा सुरू
माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी बुधवारी अचानक राजीनामा दिला. राजीनाम्यास वेळ न लावता पनन संचालकांनीही तो तात्काळ मंजूर केला. हा राजीनामा राजकीय दबावापोटी देण्यात आला की, अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने देण्यात आला याबाबत उलट उलट चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीच वर्षापूर्वी अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय व माजलगाव येथील रहिवासी अशोक डक सभापती झाले होते. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून वारंवार दबाव येत असल्याची चर्चा होती. दरम्यान माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने अशोक डक यांना राजीनामा द्यावा लागणार असे वाटत असताना अशोक डक यांनी कोर्टातून याला स्थगिती मिळवली होती. यानंतरही त्यांना राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते.अचानक बुधवारी सभापती अशोक डक यांनी पदाचा राजीनामा पणन संचालक पुणे यांच्याकडे दिला. त्यानूसार संचालकांनी तात्काळ तो मंजुर करत मुंबई बाजार समितीस याबाबत कळविले आहे.
राजीनामा ठरल्या प्रमाणे …
मुंबई बाजार समितीमध्ये आमची सत्ता आली तेव्हा अडीच वर्षेच हे पद आपल्याकडे होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडे पद घेण्यापूर्वीच आपण राजीनामा लिहून दिला होता. आपली अडीच वर्षाची मुदत संपल्याने व ठरल्याप्रमाणे आपण राजीनामा दिला आहे. पुढील सभापती राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गट यांचापैकी होईल.- अशोक डक