बीडमध्ये खरीप हंगामापूर्वी मिळणार बोंडअळीचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:32 AM2018-05-10T00:32:42+5:302018-05-10T00:32:42+5:30
बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभात बुडूख।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनदरबारी वेळोवेळी मागणी, आंदोलने करून बोंडळीचे सरसगट अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शासनाने खरिपापूर्वी हे अनुदान द्यावे अशी शेतकºयांची मागणी होती. राज्य शासनाने बोंडअळीचे सरसकट अनुदान खरिपापूर्वी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले दिले आहेत. मात्र, हे अनुदानाचे पैसे तीन टप्प्यात मिळणार असल्याने पुन्हा एकदा शासनाने कोंडीत पकडल्याची भावना शेतकºयांची आहे. हे अनुदान तीन टप्प्यात वाटप न करता सर्व तालुक्यांना एकाच वेळी दिले तर, शेतक-यांना खरिपाच्या लागवडीसाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. त्यात बीड जिल्ह्यातील क्षेत्र जवळपास ३ लाख ७८ हजार हेक्टर होते. जिल्ह्यात मुख्य पीक हे कापूस असल्यामुळे शेतक-यांचे संपूर्ण अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. मात्र कापूस वेचणीवेळी बोंडअळीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती.
पिकावर बोंडअळी पडल्यामुळे नुकसान झाले. वेळोवेळी बोंडअळी प्रादुर्भाव मदत अनुदान तात्काळ मिळण्यासाठी जिल्हाभर आंदोलने झाली. शेतक-यांचा रोष लक्षात घेऊन शासनाने खरिपापूर्वी बोंडअळी अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार बीड जिल्ह्यासाठी २५६ कोटी ५८ लाख रूपये बोंडअळी अनुदान तीन टप्प्यात वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील रक्कम शासन लवकरच जिल्हा प्रशासनाकडे अदा करणार आहे. या टप्प्यातील रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर, त्यांची यादी राज्य शासनाला पाठवायची आहे व दुसºया टप्प्यातील रकमेची मागणी करायची आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले बोंडअळी प्रादुर्भाव अनुदान खरिपापुर्वी मिळेल का हा प्रश्न मात्र कायम आहे.
बँकांना इशारा
बोंडअळी प्रादुर्भाव अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे बँक हे पैसे कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे अनुदानाचे पैसे कपात न करण्याचे निर्देश राज्य शासनाने बँकाना दिले आहे.
जिल्ह्यात एकूण कापूस उत्पादक शेतकरी संख्या ६ लाख ९२ हजार ३८ एवढी आहे. कापूस नुकसान झालेल्या शेतकºयांना जिरायतीसाठी ६८०० रुपये तर बागायतीसाठी आठ हजार अनुदान जाहीर झाले होते. मात्र, हे अनुदान कधी मिळणार यासंबंधी शेतकरी संभ्रमित होता. मात्र खरिपापूर्वी हे अनुदान बँक खात्यावर येणार असल्याने खरिप लागवडीसाठी या पैशांची शेतक-यांना मदत होणार आहे.
पीकविमाही तात्काळ द्या
गतवर्षी पिकांच्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळाली होती. त्याच आशेने या वर्षी देखील शेतकºयांनी स्वत: खिशातील पैसे घालून पीकविमा भरला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हक्काचे पीकविम्याचे पैसे तात्काळ देण्याची मागणी होत आहे. हे पैसे देखील खरिप हंगाम सुरू होण्याआधी मिळाले तर शेतकºयांना याचा फायदा होणार आहे.
निर्देशाची तत्परतेने अंमलबजावणी
जिल्हा स्तरावर येणारी पहिल्या टप्प्यातील रक्कम तात्काळ शेतकºयांपर्यंत पोहचवली जाईल. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. वेळोवेळी पाठपुरावा पुढील टप्प्यातील रक्कम देखील तात्काळ अदा केली जाईल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकºयांना बोंडअळी अनुदानाचा लाभ दिला जाईल. यासाठी जिल्हा प्रशासन राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाची तत्परतेने अंमलबजावणी करील.
- चंद्रकांत सूर्यवंशी
निवासी उपजिल्हाधिकारी, बीड