महाशिवरात्र सोहळ्याला बंधनाचे कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:28+5:302021-03-04T05:02:28+5:30
शिरूर कासार : ब्रम्हलिन संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेल्या महाशिवरात्र सोहळ्याला यावर्षी कोरोना नियमावलीचे कुंपण असल्याने ...
शिरूर कासार : ब्रम्हलिन संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेल्या महाशिवरात्र सोहळ्याला यावर्षी कोरोना नियमावलीचे कुंपण असल्याने हा सोहळा फक्त पुजाविधीने साजरा होणार आहे. महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी सोमवारी हा निर्णय घेतला. संपुर्ण तालुका व जिल्ह्याबाहेर लौकिक प्राप्त असलेल्या वैभव संपन्न व देखण्या सोहळ्याला कोरोनाची दृष्ट लागल्याची खंत सर्वच स्तरातून व्यक्त होत असली तरी सामाजिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त असल्याचे मंथन बैठकीत शास्त्रींनी व्यक्त केले.
या वर्षी मंडप, स्पिकर आणि भोजनावळीच्या पंगती पंगती नसतील. फक्त मंदिर व परिसराची विद्यूत रोषणाई होणार आहे. ४२ वर्षापुर्वी महाशिवरात्र सोहळ्याचे छोटेशे रोपटे वै.संत आबादेव महाराज यांनी लावले. या सोहळ्यासाठी तालुक्यातील सुमारे पंचवीस गावांना समक्ष भेट देत निमंत्रण देण्याची प्रथा सुरू केली. निमंत्रण देण्यासाठी महाराज आपल्या गावात थेट दारात आले या भावनेतून गावकरी जमेल तसे अर्थिक योगदान देत होते.तीच परंपरा विद्यमान महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी सांभाळली. गत वर्षी हा सोहळा मोठ्या थाटात झाला नंतर लाॅकडाऊनमुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले. सर्व व्यवहार थांबले होते. परंतू त्यात थोडी शिथीलता मिळालीत्यामुळे सोहळा होणार अशी खात्री धरून सर्वतोपरी तयारी झाली होती. मात्र अचानक पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने निर्बंध आले. त्यामुळे शिवभक्तांचा हिरमोड झाला.
संस्थानवर गर्दी करू नये
सोमवारी महंतांनी "कोरोना " प्रादुर्भाव व नियमावली गांभिर्याने घेत अन्नदाते ,व भाविकांच्या उपस्थितीत विचार मंथन बैठकीत सर्वसर्वानुमते सोहळा परंपरेला धक्का न लागता व कोरोनाचा धोका न पत्कारता फक्त पुजाविधी मर्यादीत साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला. शिवरात्र कालावधीत संस्थानवर गर्दी करू नये. शक्यतो जमेल त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण ,शिवलिला अमृत ग्रंथ पारायण घरबसल्या करावेत तो भाव सिद्धेश्वरापर्यंत पोहचेल, असे आवाहन महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे.
प्रतिकूलतेत भाविकांची साथ
गेली ४२ वर्षे अव्याहतपणे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत संस्थानावरील अन्नदानात खंड पडू दिलेला नाही. तो याही वर्षी पडू नये म्हणून अन्नदानात होणारा खर्च रोखीच्या स्वरूपात महंताकडे सुपुर्द करण्याचा स्वखुशीने बैठकीत निर्णय घेतला. हा निधी संस्थानला कामी येईल करिता सर्वांनी एकमुखी मान्यता दिली.
===Photopath===
020321\vijaykumar gadekar_img-20210302-wa0026_14.jpg