पुस्तकांची दुकाने बंद, परीक्षार्थींची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:12+5:302021-04-08T04:33:12+5:30
पुस्तके, वह्या, पेन, आवश्यक साहित्य मिळेना परळी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठांतर्गत चालू असलेल्या पदवी परीक्षा व एप्रिलअखेर ...
पुस्तके, वह्या, पेन, आवश्यक साहित्य मिळेना
परळी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठांतर्गत चालू असलेल्या पदवी परीक्षा व एप्रिलअखेर सुरू होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची दुकाने, तसेच जिल्हा व परळी शहरातील चालू असलेल्या विविध कार्यालय, बँक, शासकीय दवाखान्यांने लागणाऱ्या स्टेशनरी साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात मंगळवारपासून अचानक लॉकडाऊन करून किराणा, दूध व मेडिकल वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली. परंतु सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत पदवी स्तरीय परीक्षा ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा एप्रिलअखेर चालू होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, परीक्षा पॅड, पेन व इतर शैक्षणिक साहित्य लॉकडाऊनमुळे पुस्तके व स्टेशनरी दुकाने बंद असल्यामुळे मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. पेन पॅड नसेल तर परीक्षा तरी कशी द्यायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी बारावी वगळता इतर विद्यार्थ्यांच्या शाळेतून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. त्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी लागणारी पुस्तके, वह्या, पेन व इतर आवश्यक साहित्य न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पुस्तके व स्टेशनरी साहित्य विक्रीची दुकाने कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध पाळून उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी मोगरकर यांनी केली आहे