उसणे पैसे परत मागितले, संतप्त दाम्पत्याने भररस्त्यात केला वृद्धाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:04 PM2022-05-03T14:04:53+5:302022-05-03T14:05:01+5:30
तू खूप पैसेवाला झालास का? असे म्हणत दाम्पत्याने भररस्त्यात केली मारहाण
माजलगाव (बीड) : शेती खरेदीसाठी उसणवारीवर दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरून संतप्त दाम्पत्याने एका वृद्धाची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना १ मे रोजी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील मंजरथ येथे घडली. या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा नोंद झाला असून, त्यांना पोलिसांनी अटक केली. मारुती चुरामन घटे (६५, रा. मंजरथ, ता. माजलगाव) असे मयताचे नाव आहे.
चार वर्षांपूर्वी शेती घेण्यासाठी गावातीलच राजाभाऊ सर्जेराव गायकवाड व दैवशाला राजाभाऊ गायकवाड यांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपये उसणे घेतले होते. चार वर्षे उलटूनही गायकवाड दाम्पत्य पैसे परत करीत नसल्याने मारुती घटे यांनी तगादा लावला होता. या व्यवहारावरूनच १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता मंजरथ येथील स्थानकावर त्यांच्यात वाद सुरू होता. तू खूप पैसेवाला झालास का? असे म्हणत दैवशाला गायकवाड यांनी मारुती घटे यांचा हात धरला तर राजाभाऊ गायकवाड याने सुरीने छातीत, डोक्यात, खांद्यावर सपासप वार केले. यात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत मारुती घटे यांचा मुलगा राजा घटे यांच्या फिर्यादीवरून राजाभाऊ सर्जेराव गायकवाड, दैवशाला राजाभाऊ गायकवाड यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गावात तणावाचे वातावरण
या घटनेने गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी साहायक पोलीस अधीक्षक रश्मिथा एन. राव, सहायक निरीक्षक विजयसिंह जोनवल, उपनिरीक्षक सचिन दाभाडे यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, राजाभाऊ गायकवाड व दैवशाला गायकवाड या दाम्पत्यास माजलगाव येथील न्यायालयात २ मे रोजी हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी दिली.