दोघींना १० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:35 AM2019-07-06T00:35:30+5:302019-07-06T00:35:55+5:30
अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी सुनावली.
बीड : अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. मंजूषा दराडे यांनी काम पाहिले.
बीड येथे राहणाºया एका अल्पवयीन मुलीस सुनिता मच्छिंद्र चांदणे आणि शारदा मच्छिंद्र चांदणे यांनी गेवराई तालुक्यात जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या घटनेची खबर बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळाली होती. पोलीस विभागाच्या या पथकाने या अल्पवयीन मुलीस आरोपींनी ज्या ठिकाणी ठेवले होते तेथे बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. दोघींच्या तावडीतून सदर अल्पवयीन मुलीची सुटका केली. याप्रकरणी सुनिता व शारदा चांदणे यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात ५ जानेवारी २०१८ रोजी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गित्ते यांच्या फिर्यादीवरुन कलम ३७०, ३७२, ३६६ (अ) भादंवि तसेच कलम ५, ६, ७ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ व बाललैंगिक अत्याचार कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी करुन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र बीड येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावली. त्यानुसार सुनिता चांदणे व शारदा चांदणे यांना कलम ३७० भादंविमध्ये १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड सुनावला. तसेच कलम ५ व ६ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याप्रमाणे दोन्ही आरोपीस प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ४ बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे दोघींना ७ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. मंजूषा दराडे यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी अदिकारी आर. बी. मोरे, एस. बी. जाधव, एन. वाय. धनवडे, महिला पोलीस सिंगल यांनी सहकार्य केले.
सरकार पक्षातर्फे तपासले ७ साक्षीदार
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली.
गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले.
विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी शिक्षा सुनावली