महिलेच्या नाकाचा शेंडा कापल्याप्रकरणी मुलगा व आईस पाच वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:42+5:302021-02-05T08:20:42+5:30
रघुनाथ दत्तू फड, सत्यभामा दत्तू फड (रा. पिंपरी, ता. अंबाजोगाई), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची हकीकत ...
रघुनाथ दत्तू फड, सत्यभामा दत्तू फड (रा. पिंपरी, ता. अंबाजोगाई), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाची हकीकत अशी की, रघुनाथ दत्तू फड याने पीडित महिलेशी पाच वर्षांपासून बळजबरीने संबंध ठेवले. तिने नकार दिल्याचा राग मनात ठेवला. ९ जानेवारी २०१६ रोजी पीडित महिला तिच्या माहेराहून अंबाजोगाईकडे येत होती. त्यावेळी सेलमोहा पाटीजवळून तिला रघुनाथ व सत्यभामा यांनी बळजबरीने मोटारसायकलवर बसवून धर्मापुरी सबस्टेशन परिसरातील झाडीत नेऊन तिच्या नाकाचा शेंडा वस्तऱ्याने कापला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात रघुनाथ व सत्यभामा यांच्याविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३२६, ५०६ व ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा पोलीस तपास पोलीस निरीक्षक आर.एन. चाटे यांनी केला. हे प्रकरण अंबाजोगाईचे अप्पर सत्र न्या. माहेश्वरी पटवारी यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. सरकारी वकील रामेश्वर ढेले यांनी सात साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. रघुनाथ दत्तू फड व त्याची आई सत्यभामा दत्तू फड यांना दोषी ठरवत न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी तर रघुनाथ यास जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रामेश्वर ढेले यांनी बाजू मांडली.