आईबद्दलचे अपशब्द जिव्हारी लागल्याने अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 05:37 PM2022-01-14T17:37:25+5:302022-01-14T17:38:40+5:30
मुलाला मारहाण करत आईबद्दल वापरले अपशब्द
केज ( बीड ) : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने आई विषयी अपशब्द बोलून दोघांनी मारहाण केल्यामुळे खचून गेलेल्या अल्पवयीन मुलाने शर्टने बाथरूमच्या खिडकीस गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या तक्रारी वरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बनकरंजा येथे वसंत लांब यांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे. रविवारी ( दि ९) सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास कामानिमित्त ते शेतात गेले. यावेळी हॉटेल त्यांचा १७ वर्षीय मुलगा विक्रम सांभाळत होता. दरम्यान, कापले वस्तीवरील बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाथ लांब (नागरगोजे) हे दोघेजण हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. विक्रमने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या बळीराम आणि सुभाषने विक्रमला मारहाण करत त्याच्या आईबद्दल अपशब्द वापरले.
काहीवेळाने वसंत लांब हॉटेलवर परत आले. विक्रमने त्यांना रडतरडत घडलेली घटना सांगितली. त्यांनी विक्रमला समजावून सांगितले. परंतु, आईबद्दल वापरलेले अपशब्द त्याच्या जिव्हारी लागले होते. यातूनच विक्रमने रात्री ९:०० वाजेच्या दरम्यान बाथरुममध्ये गळफास घेतला. गळफास घेतल्याचे आढळून येताच नातेवाईकांनी विक्रमला खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
या प्रकरणी वसंत लांब यांनी दि. १३ जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) दोघे रा. बनकरंजा यांच्या विरुद्ध गु.र.नं. १०/२०२२ भा.दं.वि. ३०५, ३२३, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.