राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 02:32 PM2020-11-07T14:32:39+5:302020-11-07T14:33:53+5:30
लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद झाल्याने तो गावी आला होता.
गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान बुडून मृत्यू झाला. अविनाश जगदिश नाटकर असे मृत मुलाचे नाव असून तब्बल सात तासांनी त्याचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राक्षसभुवन येथील अविनाश जगदिश नाटकर हा औरंगाबाद येथे १२ वीचे शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद झाल्याने तो गावी आला होता. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास तो मित्रासोबत गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. पात्रात जास्त पाणी असल्याने पोहत असताना अचानक तो पाण्यात बुडाला. बराच वेळ झाल्यानंतरही अविनाश वर आला नसल्याचे मित्राच्या लक्षात आले. त्याने लागलीच याची माहिती तेथील नागरिकांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र, तब्बल सात तासानंतर दुपारी १.३० वाजता त्याचा मृतदेह आढळून आला.